For English Blog Post Click Here
उत्सवनाम : गुरूपौर्णिमा / व्यासपौर्णिमा
- आचार
- “ गुरू ” – संकल्पना
- व्यासपूजन
- पारंपारिक महत्त्व
- पौर्णिमेचे महत्त्व
- वस्त्र-दक्षिणा
- विचार
उत्सवनाम : गुरूपौर्णिमा / व्यासपौर्णिमा
उत्सवकाल : आषाढ शु. पौर्णिमा
- आचार : प्रातःकाली उठून स्नानादिकांनी शुचिर्भूत व्हावे. ज्ञानाचे आराध्य भगवान शिव, भगवान व्यास, आपल्याला गुरूस्थानी असणाऱ्या व्यक्ती, वांग्मय (ग्रंथ) इ. ची स्थापना करावी. त्यांचे आवाहान, अभिषेक इ.द्वारे षोडशोपचार पूजन करावे. त्यांना वस्त्र, दक्षिणा अर्पण करावी. त्यांच्या उपदेशसूत्रांचे स्मरण करावे आणि तदनुसार वर्तन, विहार व विचार करण्याचा प्रयत्न करावा.
- वैज्ञानिक अंतरंग :
- “ गुरू ” – संकल्पना : आजच्या जगात विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात शिक्षा प्रदान करणाऱ्यास शिक्षक किंवा प्राचार्य असे म्हणतात. याचप्रमाणे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षा व ज्ञान प्रदान करणाऱ्या व्यक्तीस गुरुजी किंवा आचार्य असे म्हणत. परंतु ही परिभाषा येथेच संपत नसून हे ज्ञान ज्याद्वारे प्राप्त होते त्यास “गुरू” असे म्हणतात. “गुशब्दस्त्वन्धकारस्यात् रुशब्दस्वन्निरोधकः | अन्धकारनिरोधित्वात् गुरूरित्यभिधीयते ||” -अज्ञानरूपी अंधःकाराचा नाश करणारे, जीवनात ज्ञानाकडे अग्रेसर करणारे तत्त्व म्हणजेच “गुरू” होय.म्हणजेच ही केवळ व्यक्ती नसून कुठलीही वस्तू, वांग्मय, विचार यामधील ज्ञानप्राप्ती करून देणारे तत्त्व म्हणजे त्यामधील “गुरुत्त्व” होय. भगवान दत्तात्रेयांनी केलेल्या विविध गुरुंचा संदर्भ याठिकाणी विचारात घेता येईल. आपल्या पंच ज्ञानेन्द्रीय व कर्मेंद्रियांद्वारे आपल्याला पदार्थांची होणारी माहिती म्हणजे “विज्ञान” तर त्यामधील कल्याणकारी तत्वाचा होणारा बोध म्हणजे त्यामधील “गुरुत्त्व” होय.
- व्यासपूजन : चराचरातील गुरुत्त्वाचे आकलन होण्याकरिता व ज्ञानप्राप्तीकरिता विशिष्ट दृष्टी असणे अत्यावश्यक असून ही व्यासांकडून प्राप्त होते. ज्यांनी हे गुरूतत्वाचे रहस्य जाणले ते “व्यास” आहेत. त्यांनी वेद, उपवेद, स्मृती, पुराण, इतिहास, दर्शन इ. विविध मार्गांनी ही ज्ञानदृष्टी इतरांना दिली आणि सशक्त व प्रगल्भ अशी शिष्य परंपरा निर्माण केली. म्हणूनच व्यासांचे यादिवशी पूजन करतात, “नमोsस्तुते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र | येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वलितो ज्ञानमयः प्रदीपः ||” या तेजस्वी परंपरांनी इतिहासात भारतवर्षाला “विश्वगुरूपदी” विराजित केले. आजही विद्वत्पीठाला “व्यासपीठ” असे म्हणतात.
- पारंपारिक महत्त्व : प्राचीन योग परंपरेनुसार या दिवशी भगवान शिवांनी सप्त ऋषींना योगज्ञानाची दीक्षा दिली. – या दिवशी भगवान व्यासांचा जन्म झाला. – बौद्ध परंपरेनुसार भगवान बुद्धांनी संघस्थापनेनंतर आपल्या पाच शिष्यांना याच दिवशी प्रथम उपदेश केला. (Dhammacakkappavattana sutta) – जैन परंपरेतील चोविसावे तीर्थंकरांनी कैवल्यप्राप्तीनंतर आपल्या शिष्यास या दिवशी गणधारा केले व स्वतः त्रीनोक गुह झाले, यास ते “त्रिनोक गुह पौर्णिमा” असेही म्हणतात. – शीख परंपरेतही या दिवशी गुरुपूजन करतात.
- पौर्णिमेचे महत्त्व : भारतीय कालगणना पद्धतीनुसार शुक्ल व कृष्ण अशा दोन पक्षांनी (एक पक्ष – १५ दिवस) मिळून एक महिना होतो. या संपूर्ण महिन्यात सोळा कलांनंतरचे चंद्रदर्शन हे अत्यंत शुभकारक असून यालाच “पौर्णिमा” असे म्हणतात. यादिवशी पृथ्वीच्या बाजूला असणारा चंद्रभाग हा पूर्णपणे प्रकाशित होतो. येथे तेजस्वी सूर्य हा प्रखर ज्ञान तेजाचे प्रतिक होय, ज्याचा प्रकाश सर्वत्र व्याप्त व सर्वांकरिता समान होय. या प्रकाशाचा अंशरूपाने स्वीकार करणारा चंद्र म्हणजे शिष्य होय. याचा परिमाण काय ? तर या ज्ञानप्राप्तीमुळे शिष्याच्या विविध कला विकसित होतात आणि पौर्णिमेला सर्वथा विकसित झालेला चंद्र हा जशी सर्वांना शीतलता प्रदान करतो अगदी त्याचप्रमाणे हा ज्ञानी शिष्यही आपल्या ज्ञानाने सर्वांचे कल्याण करतो आणि ही ज्ञानदानाची परम्परा व त्याचा मूळ हेतू साध्य करणारा ठरतो.
- वस्त्र-दक्षिणा : यावेळी देण्यात येणाऱ्या वस्त्र-दक्षिणेचेही अतिशय महत्त्व होय, यालाच “गुरूदक्षिणा” असेही म्हणण्यात येते. याठिकाणी गुरूपूजन हे केवळ गुरुचे नाही तर गुरुतत्वाचे पूजन होय आणि हे तत्त्व न दिसणारे असून केवळ अंतर्दृष्टीने प्रचीतीस येणारे असे आहे. त्यामुळे या सुक्ष्म तत्वाला स्थूल रुपात काहीही देणे शक्य नाही आणि म्हणूनच येथे देण्यात येणारी वस्त्रादि दक्षिणा ही त्याची परतफेड नसून त्याबद्दल व्यक्त केली जाणारी कृतज्ञता होय, जी प्रत्येक वेळी गुरुपूजनाचे प्रसंगी अत्यावश्यक मानलेली दिसून येते.
- विचार :
-
- निसर्ग म्हटल्यानंतर त्यामध्ये विविध प्राकृतिक घटक, पदार्थ आणि जीवांचा समावेश होतो. यांच्या क्रीयाकलापांनी पार पडणाऱ्या व्यवस्थेला “प्रकृती” असे म्हणतात.
- या प्रकृतीनुसार या प्रत्येक घटकांचे काही गुण-धर्म ठरलेले असतात, ज्यानुसार ते व्यक्त होतात. अशाचप्रकारे मनुष्याला प्राप्त झालेला एक महत्त्वाचा धर्म म्हणजे “विवेकधर्म” होय, जो त्याला इतरांच्यापेक्षा सारासार विचार व योग्य निर्णय घेण्याची क्षमता देतो.
- याच क्षमतेने तो नीती, नियम, तत्त्वज्ञान आणि संस्कार यांची निर्मिती करतो आणि तदनुसार विशिष्ट समाजव्यवस्था उभारतो, ज्याला आपण “संस्कृति” म्हणतो.
- या विवेकसामर्थ्याच्या जडणघडणीकरीता आवश्यक असते ते ज्ञान व विज्ञान आणि या दोन्हींना प्रज्वलित करणारी ज्योत म्हणजे “गुरुत्त्व” होय, ज्याचे पूजन “गुरूपौर्णिमा” या उत्सवाद्वारे केले जाते. “आत्मनो मोक्षार्थं जगत् हितायच |”
- हा संदेश देणाऱ्या या गुरुत्वाचे व्यक्ती, वांग्मय, विचार, वस्तू इ. विविध स्रोत आहेत ज्यांच्यामार्फत ही ज्ञान-विज्ञान परंपरा पिढ्यांपिढ्या वहन होत असलेली दिसून येते ज्याचा यथार्थ गौरव आणि याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच “व्यासपौर्णिमा / गुरूपौर्णिमा” होय.
- अशा या पूजानाचेवेळी अशी प्रार्थना केली जाते,
“अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया | चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ||”
-
Very informative article. Pranam to Guru Parampara by their grace we have this knowledge transferred over many many thousands of years.
महत्वाची माहिती… अप्रतिम
सदगुरू पदाचे शास्त्रशुध्द विवेचन… अत्यंत सुंदर
गुरु परंपरेचे वैज्ञानिक अंतरंगाचे तत्वज्ञान अतिशय सुरेख पद्धतीने उलगडून दाखवले आहे.
Very nice information
थोडक्यात,पण छान माहिती.श्री गुरवे नम:!